नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणाचा वाईट काळ सरला असून पुढील महिन्यापासून सरकार लसीकरणाच्या कामाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. जगातील विकसित देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रिकव्हरी दर चांगला असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, देशातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग बराच कमी झाला असला तरी अजूनही दिवसाला २५ ते ३० हजार रुग्णांची भर पडत आहे. अमेरिका, ब्राझिल, रशिया आदी देशातील रिकव्हरी दर ६० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान आहे. दुसरीकडे भारतात हा दर ९५ ते ९६ टक्के इतका आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची भारतातील सरासरी १.४५ टक्के इतकी आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर वाईट काळ मागे पडल्याचे वाटते. पण तरीही बेसावध राहून चालणार नाही. कोरोनाविरुद्ध मास्क, हात वारंवार धुणे, सामाजिक दूरत्व या बाबी आवश्यक आहेत.

देशात जानेवारी महिन्यात लसीकरणाच्या कामास सुरुवात होऊ शकते. सरकारची पहिली प्राथमिकता लसीची सुरक्षा आणि प्रभावशीलता हे आहे. कोरोनाबाबत जास्त विचार करणे वाईट आहे. मात्र काळजी तर सर्वाना घ्यावीच लागणार आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या आसपास आहे. काही दिवसांपूर्वी हा आकडा १० लाखांच्या जवळ होता. एक कोटी रुग्णांपैकी ९५ लाखांच्यावर रुग्ण याआधीच बरे झालेले आहेत.