मुंबई (प्रतिनिधी) : हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे ?  हिंदुत्व सोडणे म्हणजे काय ? धोतर नाहीये ते… हिंदुत्व अंगामध्ये,  धमन्यांमध्ये असावे लागते. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपला लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची अभिनंदन  मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली नाही.

मुख्यमंत्री म्हणाले की,  मी शिवसेनाप्रमुखांचे आणि माझ्या आजोबांचे हिंदुत्व मानतो. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय. मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. ते त्यांनी ९२-९३ साली करून दाखवलं. बाबरी मशीद पाडली गेली, मी म्हणेन त्याची सुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती. ती शिवसेनाप्रमुखांनी दाखवली. सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राम मंदिर उभारण्याची तुमची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळे तिकडे होत आहे.

हिंदुत्व म्हणजे फक्त पूजा अर्चा करणे आणि घंटा बडवणं आहे काय ? त्याने कोरोना जात नाही हे सिद्ध झालेले आहे. उगाच कोणत्याही धर्माच्या आडून तुम्ही राजकारण करू नका. आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व आणि तेही तुमचं दलालांचं हिंदुत्व शिकवू नका, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.