कोल्हापूर (प्रतिनिधी) : वडिलांच्या निवृत्ती वेतनचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एका व्यक्तीकडून ५०० रूपयांची लाच घेणाऱ्या ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयातील दोघा शिपायांना आज (गुरूवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. चंद्रकांत ऊर्फ बाळू साताप्पा मांढरेकर (वय ३६, रा. केनवडे ता.कागल), सुनिल यशवंत हजारे (वय ३० रा.हुन्न्रुर, ता. कागल) अशी अटक केलेल्या दोन कंत्राटी शिपायांची नावे आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, एका व्यक्तीने वडिलांच्या निवृत्ती वेतनचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयात अर्ज दाखल केला होता. चंद्रकांत मांढरेकर या शिपायाने त्या व्यक्तीकडे निवृत्ती वेतनाचा  प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ५०० रूपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार त्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार या विभागाने आज महावितरणच्या कार्यालयात सापळा रचून त्या शिपायांना अटक केली.