टोप (प्रतिनिधी) : टोप येथे रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. हातकणंगले तालुक्यातील १६ हाँटस्पाँट गावातील टोप हे गाव आले आहे. गावात आता कोरोनाच्या रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. असे असताना आरोग्य विभाग मात्र व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

याठिकाणी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत टोप उपकेंद्रातील आरोग्य सेवकांचे काम गेली चार ते पाच महिने चांगले सुरु होते. पण गेली २० दिवस तेच आजारी असल्याने ते रजेवर आहेत. यामुळे याठिकाणी दुसऱ्या कोणालाच चार्ज दिला नाही. गावातील रुग्ण वाढत असताना त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन तसेच तपासणीसाठी पाठवणे या सर्व गोष्टी थांबल्या आहेत. पाँझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी पाठवायला सध्या कोणीच नसल्याचे चित्र दिसून आले.

तर गावातील व्यक्ती जोपर्यंत स्वत:ला त्रास सुरु होत नाही तोपर्यंत तपासणी करण्यासाठी त्या व्यक्ती जात नाहीत. तोपर्यंत ते सर्वत्र फिरत असल्याचे पहायला मिळतेय. यामुळे रुग्णांत वाढच होत राहणार असे चिन्ह दिसत आहे. गावातील कोरोना साखळी तुटणार कशी हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेस पडला आहे. त्यातच ग्रामपंचायत कर्मचारी आणि दक्षता समिती यांच्याकडेच ही सर्व जबाबदारी आल्याने ग्रामपंचायत एकाकी लढत असल्याचे चित्र सध्या टोपमध्ये दिसत आहे.

भादोले मतदार संघातील टोप हे महत्वाचे गाव असुन या भागातील प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हापरिषद सदस्यांनी टोप गावात एकदाही आढावा बैठक घेतली नाही. त्यामुळे टोप आरोग्य विभागाने आरोग्य सेवक आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भरुन काढावी, अशी अपेक्षा नागरीकांतून व्यक्त होत आहे.