मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणातील संशयित अ‍ॅड निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवार) जामीन मंजूर केला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर तसेच दिल्ली पोलीस अटकेसाठी मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर जेकब यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने तीन आठवड्यांसाठी निकिता यांना अंतरिम जामीन मंजूर केल्याने तिला मोठा दिलासा मिळाला आहे.

टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बंगळुरूतील दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला रविवारी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर अ‍ॅड निकिता जेकब आणि बीड येथील शंतनू मुळूक यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यानंतर त्यांना अटक कऱण्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानंतर निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना जामीन मंजूर झाला आहे.