सातारा (प्रतिनिधी) : प्रतापगडावर यंदाचा शिवप्रताप दिन साध्या व कमीत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये शासनामार्फत साजरा करण्यात येणार आहे. तर वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने व इतर ठिकाणी साजरे करण्यात येणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत,  अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. शिवप्रताप दिनाबाबत  आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.

यावर्षीही मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी सोमवार (दि. २१) रोजी शिवप्रताप दिनी प्रतापगडावर करण्यात येणारे धार्मिक कार्यक्रम पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत पार पाडावे. प्रतापगडावर देवीची पूजा, ध्वजारोहण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात यावे इतकेच शासकीय कार्यक्रम घ्यावेत. यावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. या कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर पालन होण्याबाबत पोलीस विभागामार्फत योग्य ती कार्यवाही व बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या.