धामोड (सतीश जाधव) : मागील ६ ते ७ महीने प्रशासन नागरीकांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी झुंज देत आहे. पण म्हणावे तितके यश आजवर मिळालेले नाही. या पराभवाचे सर्वात मोठे कारण आहे, साडेसात लाख खेड्यात विभागलेला आपला देश. अर्थात ग्रामीण भागातील जनतेमध्ये आपापसात येणारी जवळीकता.

सुरुवातीला १-२ अंकी आढळणारी रुग्णसंख्या आता दिवसाला हजारोंच्या संख्येने वाढत आहे. याला जबाबदार देखील आपणच आहोत. पण ही वेळ कारणे शोधत बसण्याची नाही. तर कोरोनाला प्रतिबंध करण्याची आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून ग्रामपंचायत, तालुका आणि  जिल्हा प्रशासन तसेच राज्य आणि देशपातळीवर लॉकडाऊन करुन देखील, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता लॉकडाऊन करण्यात आपण पूर्ण यशस्वी झालेलो नाही, हे स्पष्ट दिसते आहे. आणि येथून पुढे तेच होणार आहे.

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वात परीणामकारक प्रयोग अर्थात कोल्हापूर महानगरपालिकेने पंधरा सप्टेंबर पासून राबवलेली “माझे कुटुंब माझी जबाबदारी” योजना सर्वात परीणामकारक दिसत आहे. या योजनेत आरोग्य यंत्रणा आणि महापालिकेचे कर्मचारी प्रत्येक घराच्या दारात जावून कुटुंबनिहाय मुले, जेष्ठ, आजारी व्यक्ती यांची विचारपूस करून, ऑक्सीजन लेवल तपासत आहेत. याला नागरिक चांगले सहकार्य करत आहेत.

हीच योजना ग्रामीण भागात आरोग्य विभाग, कोरोना दक्षता कमिटी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत प्रशासन यांच्या सहकार्याने राबविल्यास प्रत्येक गावातील आजारी व्यक्ती, आजाराची लक्षणे असणारे आणि आजारी असून देखील तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे पेशंट सापडतील. पर्यायी ग्रामीण भागात या लोकांपासून वाढत चाललेली कोरोना साखळी खंडित होईल, हे तितकेच सत्य आहे.