पुणे (प्रतिनिधी) : राज्य सरकारने ईडब्ल्यूएस चा लाभ देण्याचा निर्णय घेतल्याने  मराठा समाजाच्या आरक्षणाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक मागास वर्गाच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी आज (गुरूवार) येथे दिला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या केंद्राच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संभाजीराजे म्हणाले  की, खुल्या प्रवर्गातून ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी  ईडब्ल्यूएस  आरक्षण दिले जाते. पण त्यामुळे ‘एसईबीसी’ला धोका निर्माण होऊ शकेल.   त्यापेक्षा सुपरन्युमररीचा पर्यायही मी सरकारला दिला होता. कोर्टाने यापूर्वी एका प्रकरणात ईडब्ल्यूएसचे  आरक्षण घेतले, तर ‘एसईबीसी’चे आरक्षण घेता येणार नाही,  असा निकाल दिला आहे. त्यामुळे येत्या २५ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होईल. त्यावेळी काही घोटाळा झाल्यास  त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल. दरम्यान,  पुढील सुनावणीची तयारी करण्याऐवजी सरकार पळवाट काढत असल्याचा  आरोप संभाजीराजे यांनी केला.