कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेविरोधात भाजप आणि महाडिकांची ताराराणी आघाडी असा चुरशीचा सामना होईल, असे दिसत आहे. यानुसारच प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाले आहे. यामुळे इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केलेले इच्छुक सर्वच पक्षांचे नेते, कारभाऱ्यांकडे चकरा मारत आहे. त्यांच्याकडून उमेदवारीसंबंधी कल जाणून घेत आहेत. सर्वांनाच तगडा, तुल्यबळ उमेदवार हवा असल्याने पैसे खर्च करणारा, साम, दाम, दंड, भेद मार्गांचा वापर करणारा आणि प्रभागात सामाजिक काम, ‘घर टू घर’ संपर्क असणाऱ्यास प्राधान्य दिले जात आहे. अशांना कामाला लागण्याचे आदेश अगोदरच देण्यात आले आहे. यामुळे सर्वच प्रभागात उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे.

महापालिकेच्या राजकारणात नेहमी पक्षापेक्षा गट, तट, आघाड्यांना महत्त्व राहिले आहे. एके काळी महापालिकेवर बऱ्यापैकी वर्चस्व मिळवलेल्या जनसुराज्य पक्षाला आता अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल. माजी आमदार महादेवराव महाडिक क्रियाशील असताना त्यांनी महापालिकेवर राज्य गाजवले होते. पण गेल्या पाच वर्षांत त्यांच्याही राजकीय साम्राज्याला सुरुंग लागला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने महापालिकेची सत्ता उपभोगली.

राज्यात आता तिन्ही पक्षांची एकत्रित सत्ता असली तरी कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात पाच वर्षांपूर्वीच हा पॅॅटर्न राबविण्यात आला आहे. आगामी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने आघाडी म्हणून एकत्र नांदलेले स्वतंत्रपणे लढतील. बहुतांशी प्रभागात मैत्रीपूर्ण लढती होतील. असे असले, तरी शेवटी पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी खासदार धनंजय महाडिक अशीच चुरस पाहायला मिळणार आहे.