कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची निर्गत करण्याचे काम अद्याप सुरूच आहे. याबाबतचा अहवाल सोमवार नंतर महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल १८०० हरकती दाखल झाल्या असून या हरकतींची निर्गत करण्याचे काम महापालिकेमध्ये सुरू आहे. तीन उपायुक्त यांच्या देखरेखीखाली रात्रंदिवस हे काम सुरू असून कर्मचाऱ्यांनी ज्या दुरुस्ती केल्या आहेत त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे काम प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे करीत आहेत. दाखल झालेल्या तक्रारी आणि हरकती याबाबत आवश्यक ती दुरुस्ती करून त्याबाबतचा निर्णय घेऊन त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे.

पण अद्याप या हरकतींची निर्गत आणि त्यावर निर्णय घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची तारीख राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार आहे.