मुंबई (प्रतिनिधी) : इंटीरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुसुम यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ११ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. याचे कारण आज (शुक्रवार) न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. त्यावेळी गोस्वामी यांच्याशिवाय नितीश सारडा आणि परवीन राजेश सिंह या तिघांनाही प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. याचे कारण आज स्पष्ट करण्यात आले.

महाराष्ट्र पोलिसांनी संपादक अर्णब गोस्वामींवर दाखल केलेल्या ‘एफआयआर’मध्ये त्यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाहीत. उच्च न्यायालयाने याप्रकरणी योग्य पडताळणी केली नाही आणि अर्णब गोस्वामींना जामीन न देणं ही उच्च न्यायालयाची चूक असल्याचं देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. संबंधित प्रकरण हे एका व्यक्तीचं वैयक्तिक स्वातंत्र नष्ट करण्याच्या दृष्टीने होतं. त्यामुळे उच्च न्यायालय नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आपले कर्तव्य बजाविण्यात अयशस्वी ठरल्याचं देखील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कारणात सांगितलं.