नाशिक (प्रतिनिधी) : औरंगाबादचे नामकरण होणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या भूमिका वेगळ्या असल्या तरी मनातून ते संभाजी महाराजांसोबत आहेत. ते संभाजीराजे यांचेच भक्त आहेत. ते औरंगजेबाचे भक्त असू शकत नाहीत, असे सांगत संभाजीनगर हे संभाजीनगरच आहे आणि राहणार. त्यामध्ये काही मतभेद नाहीत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (गुरूवार) येथे स्पष्ट केले. 

भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल यांचा शिवसेनेत औपचारिक प्रवेश झाला. त्यानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, औरंगाबद विमानतळाचे नाव सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करण्यात यावे. ईडीच्या नोटीसा, ईडी लावा, सीबीआय लावा, केजीबी लावा, मात्र आम्ही एकत्रित लढू आणि विजयी होऊ. आम्ही सुडाचे राजकारण करू इच्छित नाही. भाजपचे आणखी काही नेते शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.