सांगली (प्रतिनिधी) : एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीत आंदोलन सुरू केले आहे. सांगली जिल्ह्यातील या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याचे मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील ऊस नोंदणी कार्यालय पेटवून देण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही शेतकरी संघटनेने याची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही.

सांगली जिल्ह्यातील उसाचा हंगामा सुरू होऊन दोन महिने झाले. तरीही एकरकमी एफआरपीचा प्रश्न अजून सुटलेला नाही. गाळप हंगामाच्या सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा मिळाल्यानंतर साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये संयुक्तिक बैठक पार पडली होती. कोल्हापूरच्या धर्तीवर एक रकमी एफआरपी देण्याची स्वाभिमानीची मागणी जिल्ह्यातील कारखानादारांनी मान्यही केली होती. पण सांगली जिल्ह्यातील काही कारखानदार एकरकमी एफआरी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यातूनच आज (सोमवारी) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री  पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याचे मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील ऊस नोंदणी कार्यालय पेटवून देण्याची घटना घडली आहे. या आगीत कार्यालयातील साहित्य कागदपत्रे आणि टेबल, खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत.