नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन संसदेमध्ये अशा अनेक गोष्टी असतील ज्यामुळे खासदारांची क्षमता वाढेल आणि त्यांच्या कार्यशैलीमध्ये  आधुनिकता येईल. सध्याच्या संसद भवनाने स्वातंत्र्यानंतर दिशा दाखवण्याचं काम केलं. तर नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचं साक्षीदार ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदी यांच्या हस्ते आज (गुरुवार) दिल्लीमध्ये नवीन संसद भवनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

सध्याच्या संसद भवन शेजारी असलेल्या जागेत या नव्या संसद भवनाची उभारणी होणार आहे. यासाठी सुमारे ९७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. २०२२ च्या मध्यापर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आज दुपारी ठीक १२.५५ च्या मुहूर्तावर भूमिपूजन समारंभ पार पडला. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. ते म्हणाले की, जुन्या संसद भवनामध्ये देशासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींसाठी काम करण्यात आलं तर नवीन संसदेमध्ये आता एकविसाव्या शतकातील भारताच्या महत्वकांशा पूर्ण करण्यासंदर्भातील काम होईल,

लोकशाही ही संसद भवनाचा मूळ आधार असून तिच्याबद्दलचा आशावाद आपण कायम ठेवला पाहिजे. हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. संसदेमध्ये पोहचणारा प्रत्येक प्रतिनिधी हा जनतेला उत्तर देण्यास बांधील असतो हे कधीही विसरता कामा नये. ही बांधिलकी जनतेसोबतही आहेत मात्र तितकीच राज्यघटनेबाबतही आहे.