कळे (प्रतिनिधी) : लग्न व बाळंतपणात झालेला खर्च माहेरवरून न आणल्याने  लहान मुलाला काढून घेऊन महिलेला घरातून हाकलून दिल्याची संतापजनक घटना वेतवडेपैकी खामणेवाडी (ता.पन्हाळा) येथे घडली. या प्रकरणी ऐश्वर्या शरद दळवी (वय२३) यांनी कळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती शरद बाळू दळवी, सासू बेबीताई दळवी, सासरा बाळू बाबू दळवी (सर्वजण रा. वेतवडेपैकी खामणेवाडी) यांच्यासह नणंद जया नितीन किरुळकर (रा.फुलेवाडी, कोल्हापूर) व सुजाता उत्तम पाटील (रा.पासार्डे, ता.करवीर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी पुनाळ (ता.पन्हाळा) येथील ऐश्वर्याचा विवाह शरद याच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नासाठी झालेला खर्च चार लाख व बाळंतपणातील शस्त्रक्रियेसाठी झालेला खर्च पन्नास हजार रुपये असा साडेचार लाख रुपये खर्च आजोबांकडून आणण्याचा तगादा गेल्या एक वर्षापासून तिच्याकडे लावला होता. त्यासाठी तिचा जाचहाट करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच तिच्या जवळील सोन्याचे दागिने व मुलगा युगंधर याला ताब्यातून काढून घेऊन घरातून हाकलून लावले.

अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एस.व्ही.पाटील करत आहेत.