कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाने दस्त नोंदणीमध्ये मुद्रांक शुल्कात विशेष सवलत दिली असल्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज वाढले आहे. मुद्रांक शुल्क सवलतीचा सर्वसामान्य जनतेला लाभ घेता यावा यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये १२, १९, २६ डिसेंबर या शासकीय सुट्टीदिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत. संबंधितांनी या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप पाटील यांनी केले आहे.

लॉकडाऊनमध्ये शहर आणि जिल्हयातील दुय्यम निबंधक कार्यालये बंद राहिली. त्याचा फटका सरकारच्या महसुली उत्पन्नावर झाला. ही तूट भरून काढण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने नुकतेच दस्त नोंदणी शुल्कात विशेष सवलत दिली आहे. त्याचा लाभ नागरिकांना घेता यावा, या उद्देशाने या महिन्यातील शासकीय सुट्टीदिवशी करवीरसह जिल्ह्यातील सर्व मुद्रांक कार्यालये सुरू राहणार आहेत.