पन्हाळा (प्रतिनिधी)  : पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२१’  व ‘माझी वसुंधरा अभियान’  राबवण्यात येत आहे. या अंतर्गत पर्यावरणाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी शहरातील हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. त्यासाठी पन्हाळा शहरातील प्रमुख तीन ठिकाणी महिन्यातून एकदा हवेची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे.

अशाप्रकारे हवेची गुणवत्ता तपासणी  करणारी  पन्हाळा नगरपरिषद  जिल्ह्यातील  पहिली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत वनसंवर्धन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वायू प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना, जलस्त्रोत्र संवर्धन,  वनीकरण,  धुपीकरण, पारंपरिक ऊर्जेच्या वापरासाठी जनजागृती करण्यात येत आहे. दोन्ही अभियान निसर्गाशी संबधित असल्याने  पन्हाळा शहरातील रहिवासी क्षेत्र,  व्यापारी क्षेत्र आणि घनकचरा व्यवस्थापन केंद्र या ठिकाणच्या हवेची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक बाईक, सायकल आदींचा वापर करावा. तसेच घराच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारावी. दैनंदिन निर्माण होणारा कचरा उघड्यावर न टाकता ओला कचरा,  सुका कचरा, घरगुती घातक कचरा अशाप्रकारे वर्गीकृत करून नगरपरिषदेच्या घंटागाडीत टाकावा.  तसेच नवीन वर्षातील एक संकल्प म्हणून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड स्वतःच्या अंगणात, परिसरामध्ये लावून वृक्ष संवर्धनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा रुपाली धडेल,  मुख्याधिकारी स्वरूप माणिक खारगे यांनी केले आहे.