कोल्हापूर (प्रतिनिधी) :  काल (शनिवार) पासून बेपत्ता असलेल्या माय लेकींचा पंचगंगा नदीपात्रात मृतदेह आढळून आला. सुनेत्रा संतोष सावळकर (वय ३२), खुशी सावळकर (वय १०) आणि श्रीशा सावळकर (वय ७) सर्व राहणार वडणगे अशी मृत्यू झाल्याची नावे आहेत. आज (रविवारी) ही घटना उघडकीस आली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा यांचा संतोष यांच्यासोबत ११ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. काही वर्षांपूर्वी त्यांचे पती संतोष यांचे निधन झाले होते. त्यामुळे त्या एका खाजगी ठिकाणी काम करून उदरनिर्वाह करीत होत्या. पतीच्या निधनानंतर त्या थोड्या निराश झाल्या होत्या. काल (शनिवारी) त्या आपल्या सासूला दोन मुली श्रीशा आणि खुशी यांना कामावर घेवून जातो, असे सांगून बाहेर पडल्या. सुनेत्रा, श्रीशा आणि खुशी ही रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने सासू सासऱ्यासह नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांचा शोध लागला नसल्याने नातेवाईकांनी सुनेत्रा, श्रीशा आणि खुशी बेपत्ता झाल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दाखल केली. आज (रविवारी) सायंकाळी चार वाजता पंचगंगा घाटावर तीन मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. याबाबत नागरिकांनी पोलिसांना कळवले. दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सावळकर कुटुंबियांना घटनास्थळी बोलावून घेतले. मृतदेहाची ओळख पटताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. एकाच कुटुंबातील तिघांनी अशा प्रकारे आपली जीवनयात्रा संपवल्याने सावळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करवीर पोलीस ठाण्यात सुरू होते. एकूणच या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.