कोल्हापूर (प्रतिनिधी) : आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलन केली आहेत. गंगावेश ते शुक्रवार गेट मार्गावरील ड्रेनेज आणि रस्त्याचे काम अपूर्ण असून यासंदर्भात पाहणी करून अधिकाऱ्यांना त्वरित काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. तरी कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निवेदन आखरी रास्ता कृती समितीने आयुक्तांना दिले.

या कामात अडचण येऊ नये म्हणून समितीच्यावतीने पोलीस प्रमुख आणि वाहतूक निरीक्षक यांच्याकडे एकेरी मार्ग आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदीची मागणी केली होती. याला पोलिस प्रशासनाने त्वरित प्रतिसाद देऊन गेले वीस दिवस त्याची अंमलबजावणी सुरू आहे. पण आपले महापालिकेतील अधिकारी हे गांभीर्यपूर्वक न घेता टंगळामंगळ करीत आहेत. या अधिकार्‍यांवर आपण त्वरित कारवाई करावी, रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे, काँक्रीट रोडचा प्रस्ताव शासनाकडून त्वरित मंजूर करून घ्यावे. अन्यथा जनतेच्या वतीने सदर अधिकाऱ्यांचा कासव छाप अधिकारी म्हणून गंगावेश चौकात जाहीर सत्कार करण्यात येईल. असा इशारा संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी दिला. यावेळी आयुक्तांनी त्वरित कारवाई करून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी महेश कामत, सुरेश कदम, रियाज बागवान, आर. एन. जाधव, अनंत पाटील,रोहन जाधव आदी उपस्थित होते.