नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे गेल्या २० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीचे रस्ते रोखून धरलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव हटविण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज (बुधवार) सुनावणी झाली.

शेतकरी संघटनांना सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली असून उद्यापर्यंत रस्ता रोखणाऱ्या शेतकऱ्यांची नावे देण्यास सांगितले आहे. यासोबतच या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास हा राष्ट्रीय मुद्दा होण्यास वेळ लागणार नाही, असे कोर्टाने केंद्र सरकारलाही सूचित केले. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी तातडीने याबाबत सामंजस्याने तोडगा काढावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याचिकेवरची पुढील सुनावणी आता गुरुवारी होणार आहे.