मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कोरोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करून महाराष्ट्र केसरी किताब आणि ६४व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे अन्य स्पर्धा संयोजकांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष संपर्क असलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये कुस्तीचा समावेश होता. याआधी वैयक्तिक कौशल्य आणि तंदुरुस्तीपुरती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रमाणित कार्यपद्धतीनुसार परवानगी दिली होती. सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मन स्कॅनिंग, आदी सर्व निकषांचे पालन करण्याच्या अटीवर स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली असल्याचे सरकारने म्हटले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी परवानगी मिळाली आहे. आता कार्यकारिणी समितीच्या बैठकीत आयोजनाचे धोरण ठरवण्यात येणार असल्याचे राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.