कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून क्रीडा पंढरी असलेल्या कोल्हापूरात खासदार महोत्सवातंर्गत क्रीडा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर, हे ब्रीदवाक्य घेऊन १० डिसेंबर 2023 ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये हा महोत्सव होणार असल्याचे खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खा. महाडिक म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील मुलांच्या क्रीडागुणांना वाव मिळेल. शिवाय त्यांच्या कौशल्याला मानाचे व्यासपीठ मिळणार आहे. या क्रीडा महोत्सवात पारंपारिक मैदानी खेळ, देशी-विदेशी क्रीडा प्रकार, बौद्धिक क्रीडा कसरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. तसेच ज्युदो, वूशु, कराटे, बॉक्सिंग, फेन्सिंग, मल्लखांब, तायक्वांदो, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक, धर्नुविद्या, कुराश अशा वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा होतील.

तर हॉकी, बास्केटबॉल, टर्फ फुटबॉल, रग्बी अशा सांघिक खेळांचा या क्रीडा कुंभमेळयात समावेश आहे. शिवाय ग्रामीण भागाशी सांस्कृतिक नाळ जोडणार्‍या लोकप्रिय अशा लेझीम, चिखलगुठा, लावणी महोत्सव आणि हास्य जत्रा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत. तसेच शालेय राज्यस्तरीय स्पोर्ट डान्स व दहावी राज्यस्तरीय स्पोर्ट डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कळे, गारगोटी आणि गडहिंग्लजमध्ये हे कार्यक्रम आयोजित केले जातील.

तर शहर विभागामध्ये राजमाता जिजाऊ सभागृह, शिवाजी विद्यापीठातील क्रीडा संकूल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर, विवेकानंद महाविद्यालय सभागृह, भीमा हेल्थ झोन टाकाळा, कोल्हापूर अशा ठिकाणी स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या क्रिडा कुंभमेळयात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी उमेश पाटील फोन नंबक ९८ ६० ६६ ९७ ४९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी केले आहे.

या क्रिडा महोत्सवासाठी एक विशेष आयोजन समिती तयार केली असून, त्यामध्ये अविनाश पाटील, संदीप लाड, मनोज घाटगे, विशाल पाटील, शैलेश दास, सुरज खेबुडकर, दिपक पाटील, संदीप खोत, संतोष बाबर, प्रफुल्ल धुमाळ, भरत चौगुले, मनिष मारूलकर, सुरेश चव्हाण, प्रदीप साळोखे, सागर जाधव, विकास पाटील, नंदकुमार शिंदे, हृदयनाथ चव्हाण यांचा समावेश आहे.