नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ५०.९६ डॉलर्स आहे. तरीही डिझेल, पेट्रोल महागड्या दराने विकले जात आहे. तेलाच्या किमती मागील ७३ वर्षातील सर्वाधिक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कमी दर असूनही सरकारने सामान्य ग्राहकांना फायदा न देता उत्पादन शुल्क वाढवून नफा वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मागील साडेसहा वर्षांत मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या खिशातून १९ लाख कोटी वसूल केले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला.  

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी मागील ४२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. काँग्रेसकडून सतत हे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी होत आहे. गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निवेदन जारी करत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

गांधी म्हणाल्या की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच हा देश आज एका चौरस्त्यावर उभा आहे. एकीकडे, देशाचा अन्नदाता ४२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर उभा आहे. दुसरीकडे देशातील निरंकुश, असंवेदनशील आणि निर्दयी भाजप सरकार गरीब शेतकरी आणि मध्यमवर्गीयांचे हात तोडण्यात व्यग्र आहे. कोरोनामुळे कोसळत्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपत्तीमध्ये संधी शोधत आहे.