मुंबई (प्रतिनिधी) : बिहार विधानसभेची निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र त्यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढता येणार नाही असं सांगितलं आहे. बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचं चिन्ह ‘बाण’ आहे. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर आयोगाने हा निर्णय दिला आहे.

याबाबत जेडीयू पक्षाकडून सांगण्यात आलं की, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होऊ शकतो. जेडीयूला होणारं मतदान नकळत शिवसेनेला जाऊ शकतं. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक आणि प्रसिद्ध पक्ष नाहीत. त्यामुळे शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देऊ नये अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला केली होती. नितीशकुमार यांच्या आक्षेपानंतर आता निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य करत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही असं सूचित केले आहे.

या प्रकारावर शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई म्हणाले की, बिहारमध्ये शिवसेनेला होणाऱ्या मतदानामुळे जेडीयू आणि त्यांचा मित्रपक्ष घाबरला आहे. शिवसेना बिहारमध्ये ५० जागा लढवणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवलं आहे. त्यामुळे आता आरक्षित नसलेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येईल असं त्यांनी सांगितले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी युवासेना अध्यक्ष आणि महाराष्ट्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पाठवण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत पाटण्यात पत्रकार परिषद घेतील. शर्मा यांनी ५० जागांसाठी उमेदवारांची यादी शिवसेनेचे खासदार राऊत यांना दिली आहे. यातून शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना बिहारच्या प्रचाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ८८ जागा लढवल्या आणि २ लाख ११ हजार मते मिळविली.मात्र अनेक ठिकाणी शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं होतं.शिवसेनेचा निवडणूक अजेंडाबिहार सरकारच्या राजकीय षडयंत्राला निवडणुकीच्या मैदानातून उत्तर देण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे.