पुणे (प्रतिनिधी) : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जबाबदारी घेता येत नसेल, आणि ते मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी ढकलत असतील तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांकडे ते खातं द्यावे,  अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोरोना काळातील थकीत वीजबिले वसुलीचे आदेश महावितरणाला देण्यात आले आहेत. यावरून पाटील यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले की, नितीन राऊत अशाप्रकारे जबाबदारी झटकू शकत नाहीत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव द्यावा. मुख्यमंत्र्यांकडे पैसे मागावेत.  मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवून चालणार नाही. कोरोना काळात आलेली बिले अंदाजे दिली आहेत. मागच्या बिलांची सरासरी काढून आलेली बिलं आहेत. तुम्ही आधीच्या आलेल्या बिलांच्या आधारे बिल देऊ शकत नाही. तुम्ही बिलामध्ये लोकांना दिलासा द्यायला हवा.  कोरोना काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात  वीज वापरल्याचा राऊतांचा दावा चुकीचा आहे. कोरोना काळात घरामध्ये एसी आणि पंखा वापरण्याची भीती होती. मग लोकांनी पाहिलेल्या टीव्हीचं इतके बिल येते का?, असा सवालही पाटील यांनी यावेळी केला.