कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी १५० वर्ष जे झटले त्या सर्वांच्या परिश्रमाचे आता मातीमोल झाले आहे. सध्या अँटी पीपल लॉज म्हणजे जनविरोधी कायदे करण्याचा काळ सुरु आहे. जर्मनीतही हिटलरच्या काळात असेच फटाफट कायदे झाले होते. त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांना माहीत आहे, असा आरोप राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी विधेयकांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केली.

आजपासून (२४ सप्टेंबर) केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी यात्रा राष्ट्र सेवा दलातर्फे सुरु केली आहे. या यात्रेची सुरुवात येथील राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळापासून केली. त्यावेळी ते बोलत होते. या यात्रेत महात्मा फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’या पुस्तकाचं जाहीर वाचनही केलं जाणार आहे.

ते म्हणाले, समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तीचा विचार न करता कायदे केले जातआहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती बद्दलण्यासाठी १५० वर्षे झटलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे परिश्रम आता मातीमोल होत आहेत. कोविडसारखा आजार, अर्थव्यवस्था खड्यात गेलीय, अशा स्थितीत जमिनीचे, शेतीचे कायदे बदलले तर काय होईल ? हमाल, शेतकरी, शेतकऱ्यांची मुले यांच्यासह बाजारात समित्यांवर काय परिणाम होईल, याचा विचार केलेला नाही.

केंद्र सरकार त्यांचे संशयास्पद उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घाई करत आहे. ज्यांनी भारत बनवला त्यांचे स्वप्न आणि या सरकारचे उद्दिष्ट यात जमीन-आस्मानाचा फरक दिसत आहे. शेतकरी संघटनांच्या बंदला माझा पाठिंबा आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. शिक्षण धोरण, चीन, नोटबंदी या काळातही त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. ही त्यांच्या प्रचाराची पद्धत आहे. मात्र, केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही. लोकांच्या विचार करण्याच्या शक्तीवर माझा विश्वास आहे. यावेळी सुरेखा देवी, डॉ. मेधा पानसरे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे, जनता दलाचे मधुकर पाटील, अमोल महापुरे, महादेव शिंगे, पंकज खोत आदी उपस्थित होते.