राशिवडे (प्रतिनिधी) : शिवम् प्रतिष्ठान घारेवाडी संचलित भोगावती विभागांमधील शिवम् साधकांनी सामाजिक कार्याचा वसा जोपासला आहे. त्यांनी दीपावलीचा आनंद कष्टकरी लोकांसोबत साजरा करून मानवतेचे दर्शन घडवले. ‘वंचित लोकांना आनंद द्या’, या इंद्रजित देशमुख यांच्या प्रेरणेने शिवम परिवार कार्यरत आहे. ऊसतोड मजुरांना फराळ आणि साड्यांचे वाटप करून साधकांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

पोटाची खळगी भरण्यासाठी मराठवाडा विदर्भ येथून आलेले ऊसतोड मजूर राधानगरी आणि करवीर तालुक्यांमधील अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात तात्पुरते वसले आहेत. त्यांच्या परिवारातील लहान मुले व त्यांना आर्थिक परिस्थिती अभावी दीपावलीचा आनंद घेता येत नाही. तो आनंद त्यांना मिळावा, यासाठी शिवम् परिवाराच्या वतीने दरवर्षी फराळ आणि साडी वाटपाचे नियोजन केले जाते.

यावर्षी भोगावती विभागातील साधक के.डी. पाटील, प्रा. पवन पाटील, संभाजी पाटील, एम.व्ही.पाटील, दिगंबर टिपूगडे, अजित चरपले, युवराज पाटील, प्रदीप पाटील, प्रसाद गुळवणी, अजित मगदूम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरातून फराळ एकत्र करून ऊसतोड मजुरांपर्यंत पोहोच केला. या सेवाभावी वृतीने ऊसतोड मजुरांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता.