मुंबई (प्रतिनिधी) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’तून आपल्यावर गलिच्छ भाषेत टीका होत असल्याविषयी थेट संपादक रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘सामना’मधून गलिच्छ टीका झाली, असे म्हणणे योग्य नाही. ‘सामना’त ठाकरी शैलीचा वापर केला जातो. तोच ‘सामना’चा ब्रँड आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषा ‘सामना’त लिहिली जाते, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

परब यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या आरोपांचे खंडन केले. ‘सामना’मधून मला वाटत नाही की गलिच्छ टीका होते. ‘सामना’ची विशिष्ट शैली आहे, सामना ब्रँड आहे आणि ती ठाकरे शैली आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषाच लिहिली जाते. ती भाषा गलिच्छ नसते, असे म्हणत त्यांनी अग्रलेखामधील टीकेचे समर्थन केले. त्याचप्रमाणे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी फक्त महापालिका निवडणूकच कशाला, आमच्याकडे चाळ कमिटीच्या निवडणुका लागणार आहेत, त्यातही उतरावे, असा टोलाही त्यांनी लगावला.