कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवरून चालू असलेली कायदेशीर लढाई मिटली, पण शिंगणापूरच्या शाळेतील कुस्ती मॅट प्रकरणाला एक वेगळेच वळण लागल्याची चर्चा आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवरून चालू असलेल्या कायदेशीर लढाईला आता थंडे स्वरूप आलेले दिसते. एकमेकांच्या भांडणात निधी परत जायला नको म्हणून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निधीतून त्यांना निधी द्यायचा समझोता झाल्याचे समजते. हे प्रकरण मिटवायला एका सभापतीने मध्यस्थी केल्याचेही समजते. जि.प. मधील हे एक प्रकरण मिटले, पण दुसरे मॅट प्रकरण मात्र मिटत नसल्यामुळे विरोधी नेत्यावर भूमिगत व्हायची वेळ आली आहे.

शिंगणापूरच्या शाळेतील कुस्तीच्या मॅटवरून चालू झालेले हे प्रकरण खूप गाजले. यामधील ठेकेदाराने जुने मॅट बदलून नवीन मॅट दिल्याचे समजते त्यामुळे हे प्रकरण मिटल्याचे बोलले जाते. पण याच मॅट प्रकारांतून विरोधी पक्ष सदस्यावर नोंदविलेला गुन्हा मात्र मागे घेतल्याचे दिसून येत नाही. या गुन्ह्यामुळे ३४ जि. प. सदस्यांनी विशेष सभा घ्यावी अशी मागणी केली होती. पण सदरची विशेष सभा घेतली तर सदरच्या महिला फिर्यादी या महिला आयोगाकडे दाद मागतील आणि परत यामुळे जिल्हा परिषद गोत्यात येण्याची शक्यता येईल. म्हणून विशेष सभेची मागणी करूनही घेतली जाण्याची शक्यता धूसर आहे.

ज्यांनी मॅट प्रकरण उकरून काढले ते अगदी नामानिराळे राहिलेत, पण यामध्ये भाग घेऊन प्रकरण तडीस नेणाऱ्या विरोधी नेत्यावर मात्र जामीन न मिळाल्यामुळे भूमिगत व्हायची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागल्याची चर्चा आहे.