कोल्हापूर (प्रतिनिधी) : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी उपपंतप्रधान आणि थोर नेते यशवंतराव चव्हाण यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू सभागृहासमोर उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण त्यांचे शिष्य आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती जि. प. चे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील आणि उद्योजक व्ही. बी. पाटील यांनी आज (शुक्रवार) संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची प्रेरणा लोकप्रतिनिधींना मिळावी, या उदात्त उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्‍ठानतर्फे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेने १० लाख रुपये खर्चून पुतळ्याचा चबुतरा उभा केला. कोल्हापूरचे शिल्पकार संजय तडसकर यांनी ब्राँझमध्ये साकारलेल्या या पूर्णाकृती पुतळ्याचे वजन सुमारे एक टन असून उंची ९.५ फूट, पाया ३.५ फूट आहे. या पुतळ्यास सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च आला आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी राजर्षी शाहू सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोरील जागा यासाठी सुचविली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असून या सोहळ्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभारण्याची कल्पना श्रीपतराव बोंद्रे, भिकशेठ पाटील, एम. के. जाधव, रशिदभाई शहा, एस. आर. पाटील, बळीराम पोवार आणि माझ्यासह आणखी काही कार्यकर्त्यांची होती. यापैकी अनेकजण आता हयात नाहीत. यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राजची स्थापना करुन सत्तेचे विकेंदीकरण केले. ग्रामीण विकासाला चालना दिली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींना त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती मिळावी हा यामागील उद्दात्त हेतू आहे.

या पत्रकार परिषदेला बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, राजेश पाटील, अशोक पोवार, रमेश मोरे, आदी उपस्थित होते.