मुंबई (प्रतिनिधी) : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करून भारतात परतलेल्या  टीम इंडियाचे  आज सकाळी मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.  परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेल्या शरद पवार यांनी  वेगाने सूत्रे हलविल्याने खेळाडुंचे क्वारंटाईन टळले आहे.

अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवी शास्त्री, शार्दुल ठाकूर आणि पृथ्वी शॉ हे मुंबईकर खेळाडू दुबईमार्गे ऑस्ट्रेलियातून परतले. मुंबई महापालिकेच्या नियमांनुसार या खेळाडूंना १५ दिवस क्वारंटाईन व्हावे लागले असते.  पण पवारांनी रात्री उशीरापर्यंत  मुंबई महापालिका अधिकारी आणि वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसोबत बोलून चर्चा केली. आणि मुंबईतील खेळाडूंना क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली. त्यांची केवळ आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

दरम्यान, हे खेळाडू क्वारंटाईन झाले  असते, तर त्यांना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये सहभागी होता आले नसते. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये  ५ फेब्रुवारीपासून कसोटी सुरू होत आहे. त्यासाठी टीम इंडिया २७  जानेवारीला बायो-बबलला रवाना होणार आहे.