आळते येथे शाळा सुरू : पण शिक्षकांची दांडी  आळते (प्रतिनिधी) : पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा यांनी आळते येथील केंद्र शाळेस अचानक भेट दिली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे तेथे चांगलीच खळबळ उडाली. जनगोंडा यांनी संबंधित सर्व शिक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी गटशिक्षण अधिकारी व जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

या भेटीवेळी शाळेत एकही शिक्षक आढळून आला नाही. केवळ एक मदतनीस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता ही मदतनीसच सकाळी शाळेचे गेट उघडत असल्याची माहिती मिळाली. यानंतर जनगोंडा यांनी तत्काळ मुख्याध्यापकांशी मोबाईलवरून संपर्क साधला असता मी रजेवर आहे. इतर शिक्षक येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याठिकाणी सर्व वर्गाची दरवाजे तसेच महत्त्वाच्या फायली आणि कागदपत्रे उघड्यावरच पडल्या होत्या. या अस्ताव्यस्त कागदपत्रांचा जनगोंडा यांनी मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करुन ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले. यावर अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित शिक्षकांची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले. या प्रकाराबद्द्ल नागरिक व पालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.