कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तसेच अखिल भारतीय किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील गेली वीस वर्षे आपल्या आक्रमक आंदोलनामुळे प्रसिद्ध आहेत. किंबहुना ते आंदोलक म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहेत. पण आंदोलनाचा राग मनात धरून काही व्यक्ती त्यांच्या विरुद्ध कट आणि षडयंत्र रचत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

याची कल्पना कोल्हापूर शहर डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राजारामपुरी पोलीस स्टेशन आणि शाहूपुरी पोलीस स्टेशन येथील प्रमुख अधिकारी यांच्यासोबत बैठक सुद्धा झालेली आहे. त्यांच्या मागावर काही लोक असून त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. तसेच त्यांची आणि त्यांच्या घराची रेकी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस प्रशासन, एलसीबी आणि गुप्तवार्ता यांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन संशयित हल्लेखोरांच्या मुळापर्यंत पोहोचून त्यांच्यामागे असणारी व्यक्ती शोधून काढावी. संशयित आरोपी हे झोपडपट्टी भागातील आहेत.

जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील यांना किमान पाचशे लोकांचे व्यापक शिष्टमंडळ भेटून निवेदन देणार आहे. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना, मनसे यासह आंबेडकरवादी चळवळीतील पदाधिकारी आणि संजय पाटील यांचे समर्थक त्यामध्ये असणारा असून इतर राजकीय दहा संघटना त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत.

संजय पाटील यांनी आपल्या आंदोलनातून भ्रष्टाचार आणि काळा बाजार याविरुद्ध जीवावर बेतलेली लढाई लढली आहे. रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांचे कंबरडे त्यांनी मोडले. तसेच जिल्हा परिषद आणि इतर काही संस्थांमधील भ्रष्टाचार आणि घोटाळे मोठ्या प्रमाणावर उघडकीस आणून किमान तेरा जणांना आजपर्यंत निलंबित करण्यास भाग पाडले आहे. त्याचबरोबर चार अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशी होऊन त्यांच्या सांपत्तिक परिस्थितीची चौकशी सुद्धा झाली आहे. त्याचबरोबर शेती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी लक्षवेधी आंदोलने करून ऊस उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त वाढावा मिळवून दिलेला आहे. त्यामध्ये अनेक घटक दुखावली गेली आहेत.

त्यामध्ये एक घटक या सर्व कटकारस्थानात समाविष्ट असून पोलीस स्टेशनला त्याची माहिती देण्यात आलेली आहे. हा सर्व प्रकार तातडीने थांबला पाहिजे, षड्यंत्र रचणाऱ्या आणि कटात सामील असणाऱ्यापर्यंत पोलिस यंत्रणा पोहोचून त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी आम्ही करीत आहोत. त्यांच्या केसाला धक्का लागल्यास कोल्हापूरात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते याची गंभीर दखल प्रशासनाने ठेवून योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आम्ही करीत आहोत असल्याचे सांगण्यात आले.

यामध्ये महापालिका सभागृह नेते दिलीप पोवार, काँग्रेस प्रदेश सचिव संजय पाटील, राष्ट्रवादी युवा नेते आदिल फरास, दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नितीन पाटील, विजय करजगार, दुर्गेश लिंग्रज, उत्तम पवार, दीपक कश्यप, सुजित बंडगर, संग्राम जाधव, तानाजी मोरे, राजू शेख, रियाज जैनापूरे, शिवराज घाडगे, दोनिश लोखंडे, नितीन राजशेखर, नगरसेविका सुरेखा शहा, छाया सांगावकर आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.