इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकरंजी येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने प्रशासकीय सेवेतून अविरतपणे जनसेवेचे व्रत जोपासत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कवितके यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती फिनिक्स समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराचे वितरण आज (रविवार) इचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृहात प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अतुलशास्त्री भगरे यांच्या हस्ते आणि खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आवाडे, अभिनेत्री सुरेखा कुडची, छाया सागांवकर, मेघा घाडगे,हातकणंगले नगराध्यक्ष अरुण जानवेकर, जि.प. सदस्य प्रसाद खोबरे आदी मान्यवरांच्या  उपस्थितीत करण्यात आले.

शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कवितके यांनी सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु ठेवला आहे. विशेष म्हणजे शासकीय योजनांची माहिती समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहचवण्यासाठी ते कार्यरत आहेत. याशिवाय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात देखील कार्यरत राहून विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील गरीब, गरजू व्यक्तींना विविध माध्यमांतून मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. प्रशासकीय सेवेतून जनसेवेचे व्रत अविरतपणे सुरु ठेवले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून त्यांची श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय श्रमशक्ती फिनिक्स समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. शंकर कवितके यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना देखील राज्यस्तरीय श्रमशक्ती फिनिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमित काकडे, उपाध्यक्ष विलास कुलकर्णी, प्रमोद परिट, विजय तोडकर, बाबासो घुणके, डॉ. प्रदिप पाटील, सुहास शिंदे, धनाजी शेवाळे, श्रीपती कोरे, कलावती जनवाडे, सुवर्णा काकडे, स्वाती काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.