सांगली,  (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपकडून डावलले जात असल्याने राज्याचे माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत नाराज असल्याचे बोलले जात आहे. खोत यांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न पक्षाकडून सतत होत असल्याचा सूर कार्यकर्त्यांतूनही उमटू लागला आहे. त्यामुळे भाजपप्रणीत आघाडीशी काडीमोड घेऊन पश्चिम महाराष्ट्रात स्वतंत्र राजकीय सुभा  मांडण्याची तयारी खोत यांनी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी भाजपने सदाभाऊ खोत यांना बळ दिले होते. त्यांना थेट विधान परिषदेची आमदारकी बहाल करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लावली होती. खोत यांनीही सत्तेची ऊब मिळताच राजू शेट्टीसह काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांना अंगावर घेतले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून त्यांनी रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. पण ऐनवेळी भाजपने त्यांना डावलून निशिकांत पाटील या पक्षाच्या निष्ठावंताच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. येथूनच खोत यांच्या मनात पक्षाविषयीची खदखद वाढू लागली.

त्यातच सदाभाऊ खोत यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपची आजीव सभासद नोंदणी केली. त्यांनी सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतून  कार्यकर्त्यांचे सभासद नोंदणीचे अर्ज आणि पैसे जमवले. परंतु काही दिवसांतच पक्षांकडून सदाभाऊ यांच्या गटांचे सर्व अर्ज फेटाळत त्यांनी गोळा केलेला निधीही त्यांना परत केला. त्यावेळीच  पक्षसंघटनेत आपल्याला डावललेले जात असल्याचे खोत यांच्या लक्षात आले. कार्यकर्त्यांनीही भाजपशी फारकत घेत  वेगळा विचार करावा, अशी मागणी सदाभाऊ खोत यांच्याकडे होऊ लागली. आता सदाभाऊ खोत आपला सवता सुभा मांडणार का ? की अन्य कोणता  निर्णय घेणार ?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.