सावरवाडी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न सोडवावेत या तसेच इतर मागण्यांसाठी केंद्र शासनाच्या विरोधी भारत बंद आंदोलनाचा एक भाग म्हणून बीडशेड (ता. करवीर) येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे आज (गुरुवारी) सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मुख्य चौकात सकाळी १० वा. आंदोलक कार्यकत्यांनी घोषणा देत रास्ता रोको केला. केंद्र शासनाने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे रास्त भाव मिळावा, वीजेचे दर कमी करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. रास्ता रोको आंदोलनामुळे करवीर पश्चिम भागातील चाळीस गावांची ग्रामीण वाहतूक ठप्प झाली होती. कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. बीडशेड बाजारपेठेत व्यापारी  यांनी सर्व दुकाने बंद ठेऊन भारत बंदला पाठिंबा दिला.

रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस नामदेवराव गावडे, गोकूळ दुध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापूरे, अशोक पाटील, बाबा ढेरे, जयवंत जोगडे , यांनी केले. आंदोलनात बाळासाहेब ठाणेकर, संभाजी सुर्वे, शिवाजी पाटील आरळेकर, मधुकर मांगोरे, पंडीत राबाडे, वैशाली लाड, सुर्वणा काटकर, सुजाता कुंभार, मालुबाई खांडेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले  होते. आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.