मेलबर्न (वृत्तसंस्था) : पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवाचा वचपा भारताने दुसऱ्या कसोटीत काढला. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.  भारतीय गोलंदाजांचा  भेदक  मारा  आणि कर्णधार अजिंक्य रहाणेचे पहिल्या डावातील शतकाच्या जोरावर हा विजय  साकारला.  

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन संघाने ६ बाद १३३ पर्यंत मजल मारत दोन धावांची आघाडी मिळवली होती. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना संधी दिली नाही. कमिन्सला बाद करत बुमराहने स्थिर झालेली जोडी फोडली.  कॅमरुन ग्रीनही  ४५ धावांवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. ग्रीन आणि कमिन्स यांनी ५७ धावांची भागीदारी  करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नॅथन लियॉनही सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क जोडीने खेळपट्टीवर तळ ठोकत संघाला द्विशतकी धाव  करून दिल्या. आश्विनने जोश हेजलवूडचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ३, बुमराह-आश्विन आणि जाडेजा या अनुभवी त्रिकुटाने प्रत्येकी २-२ तर उमेश यादवने १ बळी घेतला.

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल याला  ५ धावावर मिचेल स्टार्कने माघारी धाडले . तर चेतेश्वर पुजारा  ३ धावा काढून कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला.  अजिंक्य रहाणेने फटकेबाजी केले. त्याला शुबमन गिलनेही  चांगली साथ दिली. अखेरीस या जोडीने बचावात्मक खेळत  संघाला विजय मिळवून दिला.