कळे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने ११ नोव्हेंबर २०२० रोजी चतुर्थ श्रेणी कर्मचारी वेतनश्रेणी काढून ठोक भत्यावर नियुक्त करण्याबाबत निर्णय जारी केला आहे. हा शासन निर्णय चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गावर अन्याय करणारा आहे. राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे  शिक्षण चांगले व्हावे, म्हणून चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांची वेतन श्रेणी काढून तकलादू भत्यावर नेमणूक म्हणजे त्यांच्या जगण्याचा घटनात्मक अधिकार नाकारण्याचा प्रकार निंदनीय आहे.

शासनाने तातडीने हा निर्णय रद्द करून पूर्ववत वेतन श्रेणी वर नियुक्त करण्याची कायदेशीर तरदूत कायम ठेवावी, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा  करावा,  अशा आशयाचे निवेदन पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना कोल्हापूर जिल्हा माध्यमिक खासगी शाळा चतुर्थ कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आले.

यावेळी राज्य पदाधिकारी नंदकुमार पाटील, तानाजी पाटील, जिल्हा पदाधिकारी शिवाजी वरपे,  श्रीधर गोंधळी, अजित गणाचारी, युवराज लाटकर, कृष्णात पाटील, रघुनाथ सावंत, राजेंद्र कदम, तालुका पदाधिकारी संभाजी चांदेकर, सतीश खामकर यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.