कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या लक्ष्मीपुरी येथील राजाकाका इलेक्ट्रॅानिक्स स्टोअर्स व एसटी स्टॅन्ड परिसरातील बाटा कंपनीचे शोरुम आज (सोमवार) महापालिकेच्या परवाना विभागाने सील केले.

शहरात महापालिकेचा व्यवसाय परवाना न घेता व्यावसाय सुरु करणाऱ्याविरोधात तीव्र कारवाई करण्याचे निर्देश महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी परवाना विभागाला दिले आहेत. त्यानुसार परवाना विभागामार्फत आज लक्ष्मीपुरी येथील राजाकाका इलेक्ट्रॅानिक्स स्टोअर्स व एस टी स्टॅन्ड परिसरातील विचारे कॉप्लेक्समधील बाटा कंपनीची शोरुम सील करण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनखाली परवाना अधीक्षक राम काटकर, परवाना निरीक्षक मंदार कुलकर्णी, विजय वाघेला, बाळासाहेब जाधव व निलेश कदम यांनी केली.

दरम्यान, शहरातील ज्या व्यावसायिकांनी आपला व्यवसाय परवाना घेतलेला नाही. त्यांनी नवीन परवाना घेवून कायदेशीर कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन परवाना विभागाने केले आहे. नवीन परवाना मिळण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या मार्फत ऑनलाईन सुविधा पुरविण्यात आली असून WWW.Kolhapurcorporation.gov.in या संकेतस्थ्ळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.