कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले मुख्य रस्ता पावसामुळे निसरडा झाल्याने वाहने घसरून झालेल्या अपघातात अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा ऊस वाहतुकीची वाहने लावल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दत्त दालमिया कारखाना प्रशासनाला नोटीस पाठवून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

दत्त दालमिया कारखान्याच्या बेजबाबदारपणामुळे आसुर्ले -पोर्ले मुख्य रस्ता जीवघेणा ठरत आहे. कारखान्यामधून बाहेर वाहतूक करताना मळी, राख रस्त्यावर पडल्याने पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने ७ ते ८ दुचाकी घसरून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक उभा केले जातात. वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे.

आसुर्ले – पोर्ले मुख्य मार्गावरून पन्हाळा, कोल्हापूरला कामानिमित्त, शाळा कॉलेजला जाणाऱ्या प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. या रस्त्यावर उसाच्या वाहनांची गर्दी असते. ही वाहने रस्त्यावर तासनंतास लावलेली असतात. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर कारखान्यातून  मळी, इतर साहित्याची वाहतूक करताना नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे हा रस्ता जीवघेणा ठरला आहे. तरी मोठी दुर्घटना होण्यापूर्वी रस्ता स्वच्छ करावा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. परंतु याकडे कारखाना प्रशासनाने सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

याची गंभीर दखल घेत रस्त्यावरील अपघात आणि वाहतूक कोंडीस कारखाना प्रशासनास जबाबदार धरत सार्वजनिक बांधकाम विभागाने कारखाना प्रशासनास नोटीस पाठवली आहे. रस्त्यावर अपघात तसेच वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत योग्य कार्यवाही करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.