नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आज (गुरूवार) मोर्चा काढला जाणार होता. परंतु त्याआधीच पोलिसांनी हा मोर्चा रोखून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींसह  काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले.

काँग्रेस नेत्यांनी १० जनपथ येथे रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. पोलिसांनी कारवाई करत ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले. या कारवाईवर प्रियंका गांधी यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना संताप व्यक्त केला. केंद्र सरकार दिशाभूल करु शकत नाही. या सरकारविरोधात असणारे कोणतेही मतभेद दहशतवादाचे घटक असल्याचे सांगितले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.