नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बेघर नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. २०२२ पर्यंत देशातील सर्व बेघर नागरिकांना घरे बांधून देण्याची घोषणा मोदी यांनी केली. देशातील ६ राज्यांत भूकंपरोधी घरे बनविण्याच्या योजनेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते आज (शुक्रवारी)  करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

हाउसिंग टेक्नोलॉजी चॅलेंज इंडिया अंतर्गत ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ ही योजना लखनौ, इंदोर, राजकोट, रांची, चेन्नई, आगरतळा या शहरात राबविण्यात येणार आहे. शहर विकास मंत्रालयाने ही योजना तयार केली असून स्थानिक जलवायू तसेच वातावरणाला अनुसरून घरांची निर्मिती करण्यावर भर असेल. विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून भूकंपरोधी मजबूत घरे बनविली जाणार आहेत. कारखान्यातच बीम, कॉलम आणि पॅनल तयार करून सुटे भाग जोडून घरे उभारण्यात येतील. त्यामुळे घरबांधणीच्या खर्चात आणि वेळेत बचत होणार आहे.