कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ २६ नोव्हेंबररोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात सर्व प्राथमिक शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौदकर यांनी केले आहे. याबाबतची माहिती पुणे विभाग राज्य प्रसिद्धिप्रमुख हरिदास वर्णे यांनी दिली आहे.  

सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणामुळे श्रमिक जगतावर विपरीत परिणाम होत आहे. सर्वच संवर्गातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, खासगीकरणाला आळा घालून कंत्राटीकरण रद्द करावे, अंशकालीन बदली व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, मुदतपूर्व सेवा निवृत्तांचे अन्यायकारक धोरण रद्द करावे, अन्यायी सुधारित कामगार कायदे रद्द करावेत, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सर्व भत्ते मंजूर करून महागाई भत्ता व सातव्या आयोगातील थकबाकी विना विलंब द्यावी, सर्व रिक्त पदे भरावीत, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेत्तर यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, आदी मागण्यांसाठी प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी शिक्षक नेते कृष्णात कारंडे, बाळासाहेब पोवार, बळवंत शिंत्रे, रवळू पाटील, सतीश बरगे, हरिदास वर्णे, राजीव परीट, विष्णू जाधव, बाजीराव पाटील, बाबा खोत, संजय कुंभार, मारुती पाटील, अशोक साबळे, गोविंद पाटील, पी.के.पाटील आदी उपस्थित होते.