कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकनेते आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (मंगळवार) ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षि शाहू सभागृहात आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये जिल्हास्तरावर सुंदर गाव योजनेअंतर्गत ग्रामपंचायत पिराचीवाडी (ता. कागल) व ग्रामपंचायत नरंदे ( ता. हातकणंगले) यांना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराने (विभागून) सन्मानित करण्यात आले. या ग्राम पंचायतींना सन्मानचिन्ह व रोख ४० लाखांचे बक्षीस मिळणार आहे. जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

लोकनेते आर. आर. (आबा) पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाली. सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विकासाची संकल्पना समजावून घेऊन गावातील पदाधिका-यांनी गावाचा विकास साधावा, असे झाल्यास पुरस्कारासाठी जास्तीत जास्त गावे पात्र होतील, असे प्रतिपादन ना. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केले.

तालुकास्तरावर आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत ग्राम पंचायत वेळवटटी (ता. आजरा), पिंपळगाव (ता. भुदरगड), लकिकट्टे (ता. चंदगड), निवडे (ता. गगनबावडा), करंबळी (ता. गडहिंग्लज), मिणचे व संभापूर (ता. हातकणंगले), बहिरेश्वर (ता. करवीर), मुगळी (ता. कागल), वेखंडवाडी (ता. पन्हाळा), कुंभारवाडी (ता. राधानगरी), कोतोली (ता. शाहूवाडी), शिवनाकवाडी (ता. शिरोळ) या ग्रामपंचायतींना सन्मानचिन्ह व रु. दहा लाख रोख बक्षीस स्वरूपात मिळणार आहे.

या सोहळ्यासाठी उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती सर्वश्री हंबीरराव पाटील, प्रविण यादव, पदमाराणी पाटील, अति. सीईओ अजयकुमार माने, रवि शिवदास, अरूण जाधव या अधिकाऱ्यांसह जि. प. सदस्य व सर्व खातेप्रमुख गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.