सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर- मंगळवेढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केल्याने या चर्चांना दुजोरा मिळत आहे. परंतु, यावर शरद पवार यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, त्यामुळे संभ्रम वाढला आहे.  

भारत भालके यांच्या निधनामुळे उमेदवारीचा मोठा प्रश्न राष्ट्रवादीसमोर उभा ठाकला आहे. भारत भालके यांचे चिरंजीव भागीरथ भालके यांना उमेदवारी दिल्यास सहानुभूती मिळेल. परंतु त्यांना अनुभव नाही. त्यामुळे येथे राष्ट्रवादी धोका घेण्यास तयार नाही. तर पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीचे नेते प्रशांत परिचारक निवडणुकीतून माघार घेतील. तसेच अनेक राजकीय समीकरणे जुळून येतील, आणि राष्ट्रवादीचा विजय सोपा होईल, असा कयास राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वर्तवला जात आहे.

दरम्यान, भागीरथ यांची विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुढच्या वेळी उमेदवारी देण्यात येईल, अशीही चर्चा सुरू झाली आहे. पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास मतदारसंघातील प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. तसेच अनेक विकासकामे मार्गी लागतील, असेही बोलले जात आहे.