कोल्हापूर (प्रतिनिधी) : एसटी कामगारांचा रखडलेल्या तीन महिन्यांचा पगार दिवाळीपूर्वी द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज (सोमवार) महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राजीव गांधी पुतळा संघटना कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आलीत.

एसटी महामंडळ शासनाकडे विलगीकरण करण्यात यावे आणि एसटी कामगारांना न्याय द्यावा अन्यथा सरकरविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याचबरोबर याबाबत औद्योगिक न्यायालयात दावा ही दाखल करण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिला आहे.

या वेळी तीन महिने रखडलेला पगार तात्काळ मिळावा, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कामगारांना विमा कवच ५० लाखाची मदत मिळावी, सक्तीची अर्जित वीस दिवसाची रजा रद्द करण्यात यावी, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, वाढीव महागाई भत्त्याचा फरक देण्यात यावा,  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची करार रक्कम मिळावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात अरुण भास्कर, एकनाथ अतिग्रे, प्रकाश जावडेकर, सुभाष सुतार, के.पी. पाटील, ऋषिकेश बकरे, शशी चौगुले, प्रदीप चौगुले, रवींद्र चव्हाण यांच्यासह एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी, जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते.