पुणे (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठमोठ्या घोषणा करत शेतकऱ्यांच्या बांधावर गेले.  आणि तिथे जाऊन त्यांनी  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचे जाहीर केले. आमचे अजितदादा तर त्याहूनही वर निघाले. म्हणाले उद्धव ठाकरे तुम्ही ५० हजार म्हणता, बागायतदारांना दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे. पण शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे आम्हाला वाटले. पण कसले दीड लाख आणि ५० हजार रुपये,  राजा उदार नाही, तर उधार झाला आणि हाती भोपळा आला, अशी परिस्थिती आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुण्यातील मांजरी बुद्रूक येथे संवाद यात्रेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, आमच्या शेतकऱ्यांना ६ आणि ८ हजार रुपये जाहीर केले पण तेदेखील पोहोचले नाहीत. शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.   आपल्याला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात.  आमच्या कर्जमाफीवर नावे ठेवली. परंतु आमच्या योजनेमध्ये ४२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला. त्यांच्या योजनेत फक्त २९ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला,  असे त्यांनी यावेळी सांगितले.