…अन्यथा भगवा ध्वज फडकवू : ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती’चा इशारा   

0
116

बेळगाव (प्रतिनिधी) : येथील महापालिकेसमोर बेकायदा उभारण्यात आलेला लाल पिवळा ध्वज ३१ तारखेपर्यंत काढावा,  अन्यथा  शुक्रवारी १ जानेवारीला त्याच ठिकाणी भगवा ध्वज फडकाविण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन पोलीस आयुक्‍तांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने देण्यात आले. महापालिकेसमोर लाल पिवळा ध्वज उभारुन कन्नडींगानी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा देखील अवमान केला आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लाल पिवळा ध्वज तातडीने हटवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पोलीस आयुक्‍त डॉ. के. त्यानगराज यांनी निवेदनाचा स्वीकार करुन म्हणणे ऐकून घेतले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, कार्यदर्शी शुभम शेळके, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, आर.आय.पाटील, मदन बामणे, राजू बिर्जे आदी मराठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कन्नड संघटनेच्या मुठभर कार्यकर्त्यांनी मराठी भाषीकांचे वर्चस्व असलेल्या महापालिकेसमोर काल बेकादेशीरत्या लाल पिवळा ध्वज उभारला आहे. कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नसताना ध्वज उभारणाऱ्या कन्नडींगाना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांची लाठ हिसकावून घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली. एक देश एक राष्ट्रध्वज असताना कर्नाटक राज्याचा स्वयंमघोषीत असलेला लाल पिवळा ध्वज महापालिकेसमोर उभारुन तिरंगा ध्वजाचा अवमान करण्यात आला आहे. तसेच यावेळी कन्नडीगांनी राष्ट्रगीताचाही अवमान केला असून संबधीतावर कारवाई होणे गरजेचे आहे.

पोलीस खाते आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने येत्या ३१ डिसेंबर पर्यंत सदर लाल पिवळा ध्वज हटविण्यात यावा, अन्यथा त्याठिकाणी भगवा ध्वज देखील फडकाविण्यात येईल, असा इशारा देखील युवा समितीच्यावतीने देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here