कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री आणि पंचायत राजचे जनक यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ‘यशवंत उत्सवा’ चे आयोजन करण्यात आले असून वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान होणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, महापालिका शाळा प्रशासनाने निवडलेल्या विद्यार्थ्यांची ११ मार्च रोजी जिल्ह्यातील १२ तालुक्यातील प्राथमिक शाळांसह महापालिकेच्या शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यातून १ असे १२ तर महापालिकेच्या शाळांतील १२ तसेच कराड तालुक्यातून निमंत्रित म्हणून १६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या स्पर्धा दि. ११ मार्च रोजी दु. १ वा. शाहू स्मारक भवन येथे घेण्यात येणार असून प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांकास ५००१, द्वितीय क्रमांकास ३००१, तृतीय क्रमांकास २००१ आणि उत्तेजनार्थ १००१ व सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र तसेच इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार आहेत. दोन विद्यार्थी यशवंतराव चव्हाण यांच्यावर इंग्रजीमध्ये भाषण करणार असून सायंकाळी ४.३० वा ‘यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आणि आजचे दिशाहीन राजकारण’ या विषयावर इतिहास संशोधक व शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य मधुकर पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शुक्रवार १२ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे उपस्थित होते.