कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोग्य प्रशासनातर्फे १ ते १६ डिसेंबर अखेर प्रत्यक्ष गृहभेटीव्दारे क्षय, कुष्ठरूग्ण तपासणी सर्व्हेक्षण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत कोरोना आजराची लक्षणे असलेल्या रूग्णांची नोंद घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

ते म्हणाले, पहिल्या टप्प्यातच कुष्ठरूग्ण सापडल्यास उपचार करणे सोपे असते. यामुळेच व्यापक मोहीम राबवून या आजाराचे रूग्ण शोधण्यात येईल. रूग्ण शोधण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील ६ लाख ९६ हजार ५४५ इतक्या कुटंबांना भेटी देण्यात येणार आहे. यासाठी २ हजार ८४६ पथकांची निवड केली आहे. यामध्ये ५ हजार ६९२ जण असतील. हे प्रत्येक कुटुंबांना भेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असलेल्यांची नोंदणी करून घेतील. यांची तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. गरजेनुसार संबंधीत रूग्णांवर उपचार करण्यात येईल.

आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार म्हणाल्या, कोरोना चाचणीसाठी केल्या जाणाऱ्या एचआरसीटी तपासणीवेळी ६५ जणांना क्षयरोग असल्याचे समोर आले. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. १ जानेवारीपासून जिल्ह्यातील १३२० जणांना क्षयरोग झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय अजूनही या रोगाने त्रस्त असलेल्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे.